इचलकरंजी रेल्वे कृती समिती Est. Demand — 1965 Onward
← इचलकरंजी रेल्वे पुरावा संग्रह (संपूर्ण साईट) कडे परत

इतिहासाच्या पानांतून एक विसरलेलं नाव

🚂 श्री नारायण सदोबा कजरोळकर यांना मानवंदना

इचलकरंजी रेल्वे जोडणीची मागणी आज आपण करतोय, पण हा लढा किती जुना आहे याची कल्पना आहे का? आमच्या संग्रह-शोधात १९ डिसेंबर १९५६ रोजीच्या लोकसभा कामकाजाचा एक अस्सल दस्तऐवज सापडला. त्यात खासदार श्री नारायण सदोबा कजरोळकर यांनी थेट रेल्वे मंत्रालयाला प्रश्न विचारला होता — कोल्हापूर-मिरज ब्रॉडगेज मार्गात हातकणंगले ऐवजी इचलकरंजीला जोडावं, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे यांनी केली होती. सरकारने उत्तर दिलं — या मुद्द्याचा सर्वेक्षणादरम्यान विचार केला जाईल.


कोण होते श्री कजरोळकर?
जन्म ९ जुलै १८९६, अहमदनगर, महाराष्ट्र. पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई, ४ मुलगे व ३ मुली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकेकाळचे वैयक्तिक सहाय्यक असलेल्या कजरोळकरांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द आंबेडकरांनाच मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून १५,००० पेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं आणि १९६२ मध्ये पुन्हा निवडून आले. १९४७-५२ मुंबई विधान परिषदेचे सदस्य, त्यानंतर पहिल्या लोकसभेचे (१९५२-५७) सदस्य राहिले.

समाजकार्यात त्यांचं मोठं योगदान होतं — भारतीय Depressed Classes League चे उपाध्यक्ष, मुंबईच्या Harijan Seva Sangh चे अध्यक्ष, मुंबईच्या Rohidas Samaj चे अध्यक्ष, आणि १९५३ च्या पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी अनुसूचित जाती समुदायांचं प्रतिनिधित्व केलं. या अथक समाजसेवेसाठी भारत सरकारने १९७० मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरवलं. १९८३ मध्ये त्यांचं निधन झालं.

इचलकरंजीशी काहीही थेट नातं नसताना, स्वतःच्या मतदारसंघाबाहेरचा हा प्रश्न त्यांनी संसदेत मांडला — हे त्यांच्या द्रष्टेपणाचं आणि निःस्वार्थ लोकसेवेचं द्योतक आहे. आज ६८ वर्षांनंतरही ही मागणी अपूर्ण आहे. ज्यांनी या लढ्याची पहिली ठिणगी टाकली, त्या पद्मभूषण कजरोळकरांसारख्या नेत्याचं आज साधं स्मरणही आपल्याकडे होत नाही — हे आपलं दुर्दैव आहे.

आज इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीने आम्ही श्री नारायण सदोबा कजरोळकर यांना विनम्र अभिवादन अर्पण करतो. त्यांनी पेरलेलं हे बीज आज आपण पूर्णत्वास न्यायचं आहे.

🙏 विनम्र अभिवादन, श्री नारायण सदोबा कजरोळकर (१८९६-१९८३) 🙏


← पुरावा संग्रह व Timeline कडे परत